´परामाब्धि:’ ग्रंथाविषयी वैज्ञानिक संशोधन, शिक्षण, विधि, आरोग्य, अर्थकारण, समाजकारण इ. क्षेत्रांमधील मान्यवरांचे अभिप्राय

अध्यात्मसिद्‌ध वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला ‘परमाब्धि:’ हा श्रेष्ठ वैश्विक ग्रंथ अखिल विश्वाच्या कल्याणासाठी

ज्येष्ठ शास्त्रज्ञ मान. डॉ. विजय भटकर यांचा अभिप्राय

ईश्वर निर्मित विराट ब्रह्मांडातील निरतिशय सुंदर असा भारत देश हा संतांची खाण आहे. या भरतवर्षातील विकसनशील कर्नाटक राज्यामधील चिक्कोडी तालुक्यातील ‘आडी’ या खेडेगांवाचे थोर संत श्री प. पू. परमात्मराज महाराज यांनी रचिलेला ‘परमाब्धि’ हा श्रेष्ठ वैश्‍विक ग्रंथ वाचून मला खूप आनंद झाला. आजवर या जगात विविध धर्मसंस्थापक, संत महात्मे यांनी जी श्रेष्ठ साहित्य संपदा निर्मिती केली त्यात "परमाब्धि" ग्रंथ समाविष्ट होईल असे मला वाटते.

"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आईकाजी तुम्ही भक्‍त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणही जीवाचा घडे मत्सर । वर्म सर्वेश्वत पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव भोग पावे ॥४॥"

या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे परमाब्धि ग्रंथात वैश्‍विक निजधर्माची प्रचीती येते. या ग्रंथातून जगाला संत श्री परमात्मराज यांनी सदगुरुकृपेने अध्यात्मसिद्ध वैज्ञानिक दृष्टीकोन दिला असून अखिल विश्वाच्या कल्याणाचा मार्ग भक्‍तिपूर्वक दाखविला आहे.

india international multiversity
दि. ०९/०९/२०१०

‘परमाब्धि:’ हा परमपवित्र ग्रंथराज

ज्येष्ठ शास्त्रज्ञ मान. डॉ. आर्‌. एन्‌. शुक्ल यांचा अभिप्राय

|| श्री गुरुदेव दत्त॥

‘परमाब्धि:’ ग्रंथराज हा दत्तकृपा प्राप्‍त पण अवकाश ज्ञानातून पाझरलेला, विश्वचैतन्यपूर्ण, विश्वप्रेम - विश्वबंधुत्वाचा व विश्वशांतीचा प्रेरक, अत्युम वैश्विक मानवी ऊर्जेचा उच्चतम बोधकारक आत्मिक, आध्यात्मिक आविष्कार आहे. विशुद्ध एकता अध्यायांत दत्तगुरुंची स्थाने, धर्म- गुणसंघ, विश्वधर्म, सद्‌विचार, ऐक्याचे अर्थपूर्ण साग्र विवेचन हे मूळविषय चिंतन घडविते. जगद्‌वैभव या अध्यायात प्रसवलेले जीव, जगद्‌उत्पती व आदिमनूसह द्विपाद, चतुष्पाद, वनस्पतींची उत्पत्ती या विषयीच्या वर्णनात आधुनिक आनुवंशिकता विचार शेवटी निवृत्ति मार्गांपर्यंत आणून सोडतो. ‘बोधवैभव’ अध्यायात वेद-वेदांग-आगम-षड्‌दर्शने-स्मृति, पुराणे, उपनिषदे इत्यादींचे अर्वाचीनकाल उपयुक्‍त विचारमंथन अप्रतिम आहे. द्वादश आदित्य समूह, अकरा रुद्र, आठ वसुरुपे, अश्विनीकुमार वैद्य, तेहेतीस प्रकारचे देव, आभास्वर चौसष्ठ, दहा विश्वदेव, एकूण पन्नास मरुत्‌ दोनशेवीस महाराजिक, बारा यामदेव, बारा तुषित देव, बारा साध्यदेव एकतेचा आदर्श दर्शवितात. यात निभ्राश देवतांची गणना आहे. एकेशत्वाचे वर्णन आहे. उर्ध्वलोक, सिद्ध, पित्तर, गन्धर्व, किन्नर, यक्ष, पिशाचे, देवक, देवत्त्व, फ्रवसी, मलाक, एंजेल, फरिश्ता, रिसी, अरॅश, रसूल, पैगम्बर, ऋषी, जिन्न, मरीद, सैतान इत्यादी संज्ञांचा अर्थ कळतो. जगातील विविधतेतूनच एकता, बंधुत्व, प्रेमाची वैश्विक उन्नति घडवणार्‍या बौद्धिक प्रगल्भतेचे चिंतन फार बहुमोल आहे.

या ग्रंथात कार्यत्रयीत सत्व, रज, तम गुण- सृष्टी, स्थिती, संहार, सात्त्विक, राजस, तामस प्रकारांत विभक्‍त जगाला ऐक्याने धारण केले आहे. रुपत्रयी, अभिकाय - विनिकाय - सक्ङाय संघात तात्त्विक एकसंघता दाखविली आहे. भारतातील तीर्थ- देवता स्थळांची व विधि-भाव-लिंग शाला दृष्टीकोनातून खेळाचे वर्णन वैशिष्टयांतून एकता निर्माण करणारे आहे. प्राचीन अवतार समूह, तीर्थत्त्वभावमूल्ये, विश्वतीर्थ, सर्व धाम मूळ ऐक्यभाव हे कायवैभव हे मनाला एकत्त्व सुचवतात. विभववैभव अध्यायात विभवधारणा विचारधारा, जलप्रलय, वहि‌नप्रलय, भूकंपजन्य प्रलय, अन्तरिक्ष घटना- प्रकृति निहाय प्रलय, इत्यादींचे वर्णन आहे. अवतार, दिव्यपुरुष, संभूति इत्यादिद्वारे ऐक्यमूलक, समष्टीयोग आणतात. ‘कर्मसाम्राज्य’ अध्यायात कर्मपाक, संचित- प्रारब्ध, क्रियमाण कर्म, कर्मफल भोग, कर्मफल वियोग, निष्कामकर्मयोग सुचवतात. ह्यातूनच श्रम विभाजन, आश्रम प्रयोजन निर्माण झाल्याचे वर्णन आहे. भक्‍तिसाम्राज्य विषय उत्तम हाताळला आहे. योग साम्राज्यात मंत्रयोग, लययोग, हठयोग, राजयोग, वर्णने, षटचक्र धारणा, फारच सुरेख लयकारी रेखाटलेली आहेत. ‘आत्माच सर्व’ आहे. परमानंदी आहे. उत्कृष्ट विचार ! साधना साम्राज्य अध्यायात ‘ तप, यज्ञ, दान, सेवा-दिव्यबोध प्राप्त ऊर्जा जीवत्त्वाच्या सोबत येते. मन हे संसारवन आहे. साधना दुर्गरक्षण महत्त्वाचे. मनोनिग्रह अत्यावश्यक ठरतो. सद्‌गुरुच ह्यांतून तारुन नेतो.’ इ. वर्णन आहे. मूलधर्मविस्तार विचार मांडतांना चतुर्वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके, ते ते ऋषी, सात गीता, पुराणे, उपपुराणांचा तत्त्वविचार अत्यंत मार्मिकपणे केला आहे. तत्त्वज्ञान दर्शनांत न्याय, वैशोषिक, सांख्य योग, मीमांसा, वेदांत ह्या षड्‌दर्शनकर्त्या ऋषी व प्रत्येकाची स्वभाव वैशिष्टये आहेत. ‘सृष्टिरचना रहस्याचा शोध घेणारी षड्‍दर्शने मतभेद वितरक भासतात. पण एकतत्वदर्शन देतात’ हे दिसून येते. भक्‍तीचा उगम जरी वेदात असला तरी भक्‍तिदर्शन ब्रहिमष्ठागम, हैरण्यगर्भागम, वैखातसानस, पात्ररात्रागम, पूर्व शैवागम, पाशुपतागम शाक्‍तागम यातूनही घडते हे कळून येते. द्रष्टे ऋषी नामावली बघितल्यावर अत्यन्त सारभूत विषयांतील ऐक्य दाखविले आहे. हे कळून येते. ह्यानंतरच्या श्रमण आगम विचारात ‘उदीपी कुण्डीयानाचे मत तसेच वर्धमान महावीरांचे पांचयाम जैनत्व आले आहे. पुढे सप्‍तबुद्‍धांचे वर्णन आहे. बुद्‍धर्मप्रचारात मतांतरे झालीत. जैन बौद्‍ध विभागले गेले. चार्वाकदर्शन मात्र अतिशय नास्तिक म्हणून गाजले इ. वर्णन आहे.

सर्वांनी एकत्र यावे ही सद्‍भावना आहे. सत्याचा वेदप्रतिपादित सद्‍धर्म सूर्य भारतात तळपतच राहीला. संस्कृत भाषा प्रभावित झेंदादी प्राचीन भाषा, ईराक, ईराण, अरबस्थान, तुर्कस्थान, ईजिप्‍त येथे ऋषी (प्रेषित) पाठविले गेलेत इ. वर्णने आहेत. पूर्वी तुर्कस्थानात ७ प्रेषितांनी वैदिक सद्‍बोध तुर्कीजनात केला. मध्याशियांत ‘रुशम’ नावाचे लोक रहात. त्या भागात आर्मेनी, अजरबैजान, ताझिक, किर्गिझ, उझ्बेक, तुरक, तुर्कमेनी इ. होते. पूर्वी आर्यांचा अनेक ठिकाणी प्रवेश झाला इ. तिबेट या विस्तीर्ण पठाराचे वर्णन आहे.

चीन देशांत ‘प्रकृति’ ‘पुरुष’ म्हणजे ‘यीन’ व ‘यांग’ ‘ब्रह्म’ म्हणजे ‘ताओ’, कोरिया, जपान, फिलीपिन्स, फुनान (दक्षिण कंम्बोडिया) देशांत जावासुमात्रा (इन्डोनेशिया) उ. व्हिएतनाम, द. व्हिएतनाम, मलेशिया, सयाम, थायलंड, लाओस, ब्रह्मदेश येथेही मुनींना पाठविले होते. याचे वर्णनही या ग्रंथात आहे.

आर्यांच्या टोळ्या युरोपखण्डात स्थिरावल्या. ग्रीसमध्ये श्रुतीपंथ सांगण्यास आर्पीयस प्रेषित, संख्या प्रगतीपटलासाठी पायथोगोरस, वेदान्त जवळिकीस सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, प्लॅटिनास इत्यादि होऊन गेलेत. मय, इन्का, नाज्का, इ. संस्कृती अमेरिकेत रुजल्या. ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिकाचेही वर्णन आहे. सर्व महाद्वीपांत, विश्वशांती - प्रेम - बंधुत्व निर्माण होऊन ऊर्ध्वगतित्त्व प्राप्‍त होओ ही ईश प्रार्थना.

‘परमब्धि:’ या सुबोध ग्रंथात ख्रिस्ति, मुस्लिम, ज्यू इत्यादि वैदिकधर्मानंतरच्या काळात जन्मलेल्या धर्मांचे विवरणही स्तुत्य आहे. मुस्लिमांची हिजरी चौदाशे व वर्षे झाल्यामुळे क्रमश: उद्‌धार होण्याविषयीचे पूर्वीचे वचन समजून घेऊन त्यांनी वैश्विकधर्माचा स्विकार करावा’ परमाब्धि उपदेश वाक्य त्वरित अंगिकारावे, ही प्रभूचरणी प्रार्थना.

भारतांतील आठ आचार्यमतात द्वैत - अद्वैत मतभिन्नता जाणवते. पण त्याबरोबर भक्‍तिमार्गही शिकवतात. ज्ञानयोग, गूढयोग, शाबरी मंत्र समूह, नवनाथ प्रादुर्भाव, चौर्‍यांशी सिद्‌ध, श्रीपादश्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती, अक्कलकोट स्वामी यांचा उल्लेख आहे. आखाडा परंपरा, गोसावी परंपरा, महानुभव त्रङ्‍कणारुप संघातील संत वर्णन आहे. विवेक वती शेलना, लिंगायत, वक्ष:स्थली शेलनेतही उच्चतम सन्त झालेत. वारकरी पंथात निवृत्ती-ज्ञानदेवादि संत झालेत.

भारत देशांतर्गत विविध प्रदेशांत अनेक सत्‌पुरुष जन्मले. पंथाधारक जन्मले, महाराज प्रसिद्ध झालेत. सकाश सिदधांचा व इतर योगी महात्म्यांचा ही यात उल्लेख आहे. राष्ट्र चालन प्रकराणांत कलियुगाची उपयुगे, त्यातील आश्वर्तयुगांत सिकंदर युनानी, चन्द्रगुप्‍त मौर्य, चाणक्य, शुंकासयुगांत सातवाहन शुंग, काण्व, विक्रम, कालिदास, नागार्जुन इत्यादी प्रसिद्ध पुरुष झाले. गुप्‍त, संहोडयुग, निम्रक्षयुगातील ‘जेहाद’ मुस्लीमराजे, शिवाजी महाराज, पेशवे, पोर्तुगीज, डच, इंग्रज वगैरे वर्णने इतिहास दाखवतात. ह्यापुढील वित्वङ्‍कयुगात इंग्रजांचे साम्राज्य, भारत स्वातंत्र्य संग्राम इ. वर्णन आहे. एकात्मतेकरता योग्य जनतंत्रता, शासन ह्यावरील समग्र विचार आहे. संशोधकवृत्ती आहे. राष्ट्रऐक्य, विश्वमैत्री व पृथ्वीला तीर्थक्षेत्र बनवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. या ग्रंथात अप्रतिम देशप्रेमही आहे.

परमाब्धि: हा परमपावन ग्रंथराज सर्व मानव जातीसाठी, अतिप्राचीन - प्राचीन, अर्वाचीन - आधुनिकम, अध्यात्म, राष्ट्रप्रेम, एकता, विश्वप्रेम, विश्वशांती, विश्वबंधुत्व निर्माण करुन देणारा आहे. हे अत्त्युत्तम हृदयंगम, स्वर्णशब्दरुप असे आकाशांतून अवतरलेले ज्ञान आहे. हे प्रचार प्रसाराचे उत्तम माध्यम मानावे. प. पू. परमात्मराज महर्षीच्या देववाणीतून प्रकटलेले हे चिरंतन, दिव्यातिदिव्य सुज्ञान प्रजेला सुज्ञानी बनवेल, ह्यात शंका नाही.

॥ इति शम्‌ ॥

(डॉ. आर. एन्‌. शुक्ल)
(Ph. D., D.Sc., D. Lit,)
ए/२१, स्नेहविर, औंध टेलिफोन एक्स्चेंज जवळ
औंध, पुणे - ४११ ००७

‘परमाब्धि:’ हा मन:शांतिप्रदायक ग्रंथ

प. पू. परमात्मराज महाराज, साष्टांग दंडवत,

परमाब्धि: पाहिला व मन:शांती मिळाली. आजच्या युगाला ज्या ज्ञानाची, ज्या भगवतीय शक्‍तीची गरज होती ती परमाब्धिच्या व आपल्या रुपाने अवतीर्ण झाली. या ग्रंथातून आपण सर्व मानव समाजाकडून जी अपेक्षा ठेवली ती पुर्णत्वास जावून, वौश्विक धर्म रचनेचे आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरावे, यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा.

॥ जय परेश सर्वायण॥

श्री भूषण मोदी
गुरुवार पेठ, अम्बा जोगाई जि. बीड
(मा. श्री. भूषणजी मोदी,
अध्यक्ष - बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, शाळा व मुखबधिर व अपंगाचे कॉलेज, व्यायाम शाळा.
फर्म - गुरुगणेश जिनिंग अँण्ड प्रेसिंग,
(राज मेडिकल्स, लॅंड डेव्लपर्स.)

जगाच्या विकासासाठी परमाब्धिप्रसार आवश्यक

जगाचा विकास व्हायचा असेल तर प्रत्येकाने परमाब्धि वाचला पाहिजे. परमाब्धि ग्रंथाचा पूर्ण विचार केल्यास असे दिसून येते की परमाब्धि ग्रंथातील प्रत्येक शब्दात विश्व हलविण्याची ताकद आहे. प्रत्येक शब्द मानवाला जगण्याचा अर्थ सांगून जाती- जमातीतील हिंसाचार, भ्रष्टाचार, अनिष्ट वृत्ती अन्यायकारक गोष्टी यांचा मुळासह नायनाट करायचा असेल तर परमाब्धि ग्रंथ प्रत्येकाला वाचायला दिला पाहिजे, प्रत्येकाने तो वाचला पाहिजे. आणि कृतित आणला पाहिजे. यामुळे जगाचा विकास होईल.

प्रा. अनिल बलगुडे
एम्‌ . ए. एम्‌. फील. (मानसशास्त्र),
श्री छत्रपती शहाजी महाविद्यालय,
कोल्हापूर.

‘परमाब्धि:’ हा सर्व मांगल्यमय विचार देणारा ग्रंथ

श्री दत्त देवस्थान आडी येथील श्री परमात्मराज म्हणजे साक्षात सिद्धपुरुष त्यांनी त्यांच्या सिद्धहस्ते लिहिलेला ‘परमाब्धि:’ हा ग्रंथ वाचला. श्री दत्‍तात्रेयांच्याच आशीर्वादाने हा ग्रंथ लिहिला आहे.

संस्कृत श्र्लोक आणि त्यांचा अतिशय सहजसुंदर भावार्थ यामुळे ॐकार, जप, ॐ हाच सूक्ष्मवेद, धर्म व त्याचा अर्थ अशा विविध विषयांबाबत माहिती झाली. त्या प्रत्येकामागील सद्‌हेतू, सद्‌वर्तन यांचाही परिचय झाला. सद्‍धर्म चांगल्याचे पोषण करणारा, निर्मळ आहे. सत्संग, श्रद्धा, सेवा, त्याग हे सर्व सद्‌गुण आहेत. सत्‌ असत्‌च्या अर्थविषयी असलेला सम्यक्‌विचार म्हणजे विवेक. अशा प्रकारच्या मानवी जीवनाशी निगडीत अशा विविध संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने सहज वाचता येतील अशा सांगितल्या आहेत. जगातील विविध पंथ, संप्रदाय, अनेक महानुभूती अशा सर्वांचा परामर्ष प्रस्तुत ग्रंथात आहे. विश्वशांतीचा संदेश, सर्व धर्म समभाचव, सद्‌विचार, सद्‌वर्तन असा सर्व मांगल्यमय विचार देणारा हा ग्रंथ आहे.

कलालाराच्या तपश्‍चर्येला उत्तम यश लाभते ते कलाकाराच्या आध्यात्मिक भावनेमुळे. ही कला उच्चतम स्थितीत पोहोचण्यासाठी कलाकारालाही जाती, धर्म, पंथ, असत्य इतर सर्व दुर्गुणांपेक्षा कलेत रममाण व्हावे लागते आणि यातूनच उच्च कोटीची कला साकारते की जिचा आनंद सामान्यांतल्या सामान्यांनाही मिळतो. परमाब्धि हा आध्यात्मिक ग्रंथ आम्हां कलाकारांनाही अतिशय मार्गदर्शक ठरेलच, अनेक तत्त्वचिंतकांनाही अतिशय मार्गदर्शक ठरेल. तरुण पिढीही सुसंस्कृत बनण्यासाठी आदर्श ठरेल.

प्रा. डॉ. सौ. भारती वैशंपायन, M. A., Ph. D. प्रोफेसर आणि विभागप्रमुख,
संगीत व नाटयशास्त्र विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

परमाब्धि:’ ग्रंथाचा आशय अतिशय छान आहे

स. न. वि. वि.

परमाब्धि ग्रंथ वाचला. या ग्रंथामध्ये विषयाची मांडणी व एकंदर आशय अतिशय छान साधला आहे. आपल्या सारख्या संतांनी समाजासाठीच कार्य करायचे असते. अशी माझी स्वत:ची धारणा आहे. त्या दिशेने आपण केलेले कार्य खरोखरीच स्तुत्य आहे.

कळावे

आपला
डॉ. राजेंद्र अभ्यंकर M.S. ( Ortho.)
पूर्वा हॉस्पिटल,
११६९, के, राजाराम रोड, टाकाळा, कोल्हापूर.

परमाब्धि:’ निर्मिती हे प्रचण्ड मोठे कार्य

स्वानुभव या पुस्तिकेत प. पू. परमात्मराज महाराज यांचे आत्मचरित्रात्मक निवेदनात्मक लेखन आहे.

‘परमाब्धि:’ हा ग्रंथ ६४७ डेमी पृष्ठांचा प्रचंड ग्रंथ आहे. त्यामध्ये प. पू. परमात्मराज महाराज यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे की जगातील विविध राष्ट्रांमध्ये विश्वैकात्मता निर्माण व्हावी म्हणून ह्या ग्रन्थाची निर्मिती आहे. असा हा बृहत ग्रंथ ३५ अध्यायांचा आहे.

हे प्रचण्ड मोठे कार्य केल्याबद्दल प. पू. परमात्मराज महाराज हे धन्यवादास पात्र आहेत. ग्रंथात सात विभाग असून प्रत्येक विभागात पाच अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायावर लिहिणे हे मोठेच काम आहे. येथे फक्‍त वरवरच पाहून त्याबद्दल लिहिले आहे. या प्रचण्ड ग्रंथामध्ये विविध विभागातील श्री महाराजांचे लेखन उत्तमच आहे. त्याचा परामर्श घेणे हे कार्य फार विस्तृत होईल. कारण यातील तात्विक विभाग हा केवळ वरवर पाहून होणार नाही.

तथापि त्या ग्रंथातील ‘विभा विस्तार’ हा अठरावा अध्याय (पृष्ठ २८३) हा फारच वाचनीय आहे. भारतीय संस्कृतीचा केवळ प्रसार केवढा विश्चदूर होता हे चांगले लिहिले आहे. इराण मधील चायमान राजाबद्दल लेखक लिहितात. दिल्ली विद्यापीठात याच ‘चायमान’ राजाबद्दल संशोधनात्मक लेखन झाले आहे. त्रिविष्टप (तिब्बत) देशाबद्दल ही असेच आहे.

प. पू. महाराजांनी चीन आणि जपान येथे भारतीय विचारांचा कसा पूर्ण अंतर्भाव होऊन त्या त्या संस्कृती आपल्या अंगाने आविर्भूत झाल्या होत्या, हे चांगले दाखविले आहे.

या ग्रंथामध्ये परकीय देश संस्कृती तेथील जनता आणि तत्त्वज्ञान यांचेबद्दल द्वेषभाव किंवा कुत्सित संभावना हे मला दिसून आले नाही. याचे मूळ कारण हे की प. पू. महाराज हे एक दैवी आध्यात्मिक अधिष्ठानावर विचारारुढ होऊन हा सर्व चित्रपट पहात आहेत. द्रष्टा आणि दृष्टी अध्यात्मारुढ असल्याने त्रिपुटीतील दृश्य हे साहजिकच दैवी पातळीवर राहाते. त्याला नागर विचाराचा स्पर्श होत नाही.

हा बृहत्‌ग्रंथ वाचनीय आहे. सुलभ संस्कृत आणि सरल मराठी अनुवाद ही वाचकांची फार मोठी सोय आहे. उत्कृष्ट कागद छपाई आणि मांडणी ह एक ‘परम’ वैशिष्टय आहे.

दि. २२/०३/२०१०
प्राचार्य वसंत कृष्ण नूलकर
M. A., P. G. D. Econ. (Lond)
लक्ष्मी निवास, ८९३, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०.

मानवी मनाचे नंदनवन करणारा ग्रंथ ‘परमाब्धि:’

मानवजातीच्या कल्याणासाठी परमपूज्य परमात्मराज यांनी लिहिलेला ‘परमाब्धि:’ हा ज्ञानमृताचा अलौकिक ग्रंथ आहे. वैश्विक मांगल्याची प्रार्थना करणारा, जाति-धर्माच्या भिंती पाडून मानवताधर्माची स्थापना करणारा, मनोविकारावर मात करुन सुख - शांतीचा मार्ग दाखविणारा आणि सद्‌विचार व सदाचाराचे रक्षण करणारा हा ग्रंथराज उद्‌बोधक व प्रेरक आहे. सध्याचे जग ‘माहिती - तंत्रज्ञानाचे’ व ‘माहितीचा विस्फोट’ असणारे युग आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अशक्य वाटणार्‍या अनेक गोष्टी सहज शक्य केल्या आहेत. अगदी टाचणी पासून ते अवकाशातील उपग्रहापर्यंत विविध साधनांची, उपकरणांची निर्मिती करणारा मानव आता तर चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न पहात आहे. एका बाजूला माहिती - तंत्रजज्ञान व विज्ञानाच्या साधनाद्वारे संपूर्ण जग ‘ग्लोबल व्हिलेज’ बनून एकमेकांच्या अगदीजवळ येत असताना या साधनांची निर्मिती करणारा मानव मात्र एकमेकांपासून भावनिक व मानसिकदृष्टया खूप- खूप लांब चालला आहे. भौतिक समृद्धीच्या झगमगाटात माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी स्वकेंद्रित बनलेला मतलबी माणूस स्वार्थासाठी वाटेल ते करायला तयार आहे. आत्मकेंद्रित प्रवृत्ती, स्वार्थी प्रवृत्ती, अप्रामाणिकता, कामचुकारपणा, चौर्यप्रवृत्ती, भ्रष्ट आचरण, अनैतिक व बेशिस्तवर्तन इत्यादी अवगुणांची चलती असून मानवी मूल्यांचे मात्र दिवसेंदिवस अवमूल्यान होत आहे. समाजमनाची भौतिक प्रगती होत असताना नैतिक अधोगती होत आहे. नैतिकदृष्टया भिकेकंगाल बनलेल्या दरिद्री मानवाला सत्यम्‌, शिवम्‌, संदरम्‌ ची आराधना करायला लावण्यासाठी, मनुष्यातील पशुत्व दूर करुन त्याच्यातील माणूस जागा करण्यासाठी, अधर्माच्या विषवल्लींचा नायनाट करुन मानवता धर्माची पताका फडकविणेसाठी, अध्यात्माच्या पवित्र ज्ञानगंगेत एकाकार होऊन आत्म्याचे परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणेसाठी आणि समाजातील दुष्ट व घातकी प्रवृत्ती नष्ट करुन आदर्श व सुसंस्कृत व्यक्‍तीच्या जडणघडणीसाठी ‘परमाब्धि:’ हा एक आचार व विचार धर्माचा मूलमंत्र आहे.

संस्कृत अक्षरसंपदेला अत्यंत सम्यक व व्यापक स्वरुपात व्यक्‍त करणारा हा ग्रंथ सद्‌गुणांचे विकसन व संवर्धन करणारा व आध्यात्मिक विचारांचा प्रकाश आहे. संस्कारक्षम व सात्विक मनांची जडण - घडण करुन मानवाशी मानवाचे नाते जोडणारा हा ग्रंथ नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचा खजिना आहे अध्यात्मातील अमृतकण सहज सोप्या भाषेत वेचण्याचे सामर्थ्य असणारा हा ग्रंथ आकाराने मोठा जरुर आहे. परंतु असामान्य व अलौकिक असलेले आध्यात्मिक ज्ञान सामान्यातला सामान्य व्यक्‍ती पर्यंत पोहचविण्यासाठी केलेला हा प्रयत्‍न एक भाग आहे. मायावी जगातील वासना विकारांच्या मोहात व अंधाराच्या खोल गर्तेत सापडलेल्या क्षुद्र मानवाला अध्यात्मवादी बनवून त्याचे जीवन प्रकाशमय व ब्रह्ममय बनविणारा हा पवित्र ग्रंथ केवळ वाचनीय नसून अनुकरणीय आहे. या पवित्र - पावन ग्रंथातील मौलिक, प्रेरक व उद्‌बोधक विचाररत्‍ने ही ‘मानवी जीवनाची आचार संहिता’ बनल्यास मानवी मने कलुषित करणारा अवघ्या विश्वातील विषमतेचा काळाकुट्ट अंधार कायमचा नाहिसा होऊन मानवी जीवन सुवर्ण किरणांनी उजळून निघेल. मानवी मनाचे नंदनवन होईल.

दि. २४/०५/२०१०
प्रा. आशपाक मकानदार, गडहिंग्लज
एम. ए. एम. एड., एम. फील.
जिल्हा कार्याध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम
ओ. बी. सी. ऑर्ग.
अध्यक्ष, मुस्लीम ओ. बी. सी. सेवा संस्था
सदस्य, गडहिंग्लज नगरपरिषद शिक्षण मंडळ
विशेष कार्यकारी अधिकारी.

परमाब्धि:’ मधील न्याय व्यवस्थेविषयीचे विचारही स्तुत्य

सस्नेह प्रणाम,

आपल्या ‘परमाब्धि:’ ग्रंथाचे अवलोकन व वाचन केले.

मी स्वत: एक विधिज्ञ आहे.

आपण आपल्या ग्रंथातील ‘अथ न्याय व्यवस्था’ या सदराखाली न्याय कोणास व कसा मिळावा, न्यायदानाच्या प्रक्रियेत कोणत्या तत्वांचा अंगिकार व विचार करावा. न्याय व्यवस्था कशी असावी याबाबत केलेले कथन स्तुत्य आहे. मला आवडले. त्यात आपण दर्शविल्याप्रमाणे सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे.

आपणास हार्दिक शुभेच्छा !

अ‍ॅड. शरद. शि. लोमटे
बी. एस्सी., एलएल. बी.
अतिरिक्‍त जिल्हा शासकीय अभियोक्‍ता, पॅनल अ‍ॅडव्होकेट
स्टेट बँक ऑफ इंडिया व मराठवाडा ग्रामीण बँक, अध्यक्ष,
खोलेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, शेतकरी सह. सोसा. अंबाजोगाई,
संचालक, एम. आय. टी. शिक्षण संस्था, पुणे, योगेश्वरी देवी
देवल कमिटी अंबाजोगाई, वैद्यनाथ अर्बन को- ऑप. बँक,
अंबाजोगाई, योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई,
उपाध्यक्ष, अंबाजोगाई वकील संघ.
पत्ता - गौंड गल्ली, अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र)