परमाब्धिपारायणावश्यकता

  • परमाब्धिमधील बोधामृताचा नेहमी मनसोक्‍तपणे अतंत्य आस्वाद घेत राहणे म्हणजे परामाब्धिप्रस्वादन होय. परामाब्धिग्रंथाचे वाचन, चिंतन इ. करताना किंवा सहजस्मरणकाळीही दिव्य आनंद उपभोगत राहणे म्हणजे परामाब्धिप्रस्वादन होय. परामाब्धिशी अखण्ड, अक्षय संबंध प्रस्थापित करुन अखण्ड, अक्षय आनंदाचा अपरिमित आस्वाद घेत राहणे म्हणजे परामाब्धिप्रस्वादन होय. सर्वव्यापक चैतन्यैकत्त्व पूर्णत: समजून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • मायेच्या प्रस्वंजनकार्यामुळे सगुणत्त्व, सांकारत्त्व प्रकट होते. परन्तु सगुण - निर्गुण, साकार - निराकार असा बाह्यात: भेद दिसत असला तरी तत्त्वत: एकत्त्वच सर्वदा विद्यमान आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • जीवत्त्वाशी संबद्‌ध असलेली अविद्या ही प्रस्वापन कार्य करीत असते, म्हणजेच जीवांवर प्रस्वापनास्त्राचा प्रयोग करुन त्यांना मोह निद्रेच्या अधीन करुन टाकत असते. ‘प्रस्वापन’ नामक अस्त्राचा प्रभाव पूर्णत: नष्ट करण्यासाठी म्हणजेच अखण्डपणे पूर्ण जागृत राहण्यासाठी सर्व साधकांनी परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • मानवांना मोहनिद्रेतून जागृत करण्यासाठी जगदारंभी वेदाचे प्रकटीकरण झाले. त्यानंतर कालौघात प्रचण्ड मोठया प्रमाणात ग्रंथांचा उद्‍भव झाला. विविध वेदशाखांशी संबंधित अनेक ग्रंथ, उपवेद षट्‌शास्त्रे, दर्शने तसेच विविध आगम ग्रंथ, विविध स्मृति, इतिहास व पुराणग्रंथ, विविध पथ/ प्रसंग संबंधित विविध गीता ग्रंथ तसेच इतरही प्रबंध ग्रंथा़ची उत्पत्ती झाली. त्याचप्रमाणे अवेस्ताबायबलकुराणादि ग्रंथांचाही आविर्भाव झाला. जगभरात निर्माण झालेल्या शेकडो पंथांमध्ये त्या त्या पंथांमधील संतांचे पुष्कळशे ग्रंथही उदयास आले. परन्तु जगातील विविध धर्मपंथांमधील असंख्य लोकांनी या कलियुगात विविध ग्रंथाचा उपयोग मुख्यत्त्वे अज्ञानग्रंथीचा नाश करण्यासाठी करण्याऐवजी ग्रंथवचनांचा भ्रामक अर्थ काढून व ग्रंथांमध्ये प्रक्षेपादि कृत्ये करुन परस्परविद्वेषग्रंथींची वाढ करण्यासाठी केला, हे उघड सत्य आहे. हा मानवजातीने पूर्वकाळातील असंख्य ग्रंथांवर केलेला भीषण अन्याय आहे. या अन्यायरुप प्रचण्ड पापाचे परिमार्जन करण्यासाठी व सर्व पूर्वग्रंथांचा यथार्थाशय कळून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिप्रस्वादन करावे
  • ‘परमाब्धि’ या विश्वधर्मग्रंथाविषयी मानवांनी आपल्या मनात आदर बाळगणे म्हणजे जगातील पूर्वकालीन सर्व धर्मग्रंथांविषयी आदर बाळगणे होय. त्याचप्रमाणे परमाब्धिमध्ये प्रयुक्‍त अशा संस्कृत भाषेविषयी आदर बाळगणे म्हणजेच जगातील सर्व लोकभाषांविषयी आदर बाळगणे होय. संस्कृतभाषेतून अनेकानेक भारोपीय (इंडो युरोपीयन) भाषांची उत्पत्ती झाली आहे, हे असे स्पष्ट आहे, तसेच झेंदादि भाषाही संस्कृतोत्पन्न आहेत, हे ही तितकेच स्पष्ट आहे. "दैवी भाषा संस्कृत ही जगातील मूळ भाषा आहे", हे पूर्णत: मान्य करुन जगातील भाषाशास्त्रज्ञांनी जगातील विविध भाषांचा पूर्वानिष्टग्रहत्यागपूर्वक अभ्यास केल्यास ते भाषाक्षेत्रीय वैश्विक एकात्मतेचाही अनुभव घेऊ शकतील. भाषाशास्त्रदृष्टया परमाब्धिग्रंथाचा अभ्यास हा भाषाशास्त्रज्ञांना विराट्‍ आनंदोद्यानातील अफाट आनंदरुपच वाटेल. म्हणूनच या दृष्टीनेही परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • कोणत्याही भाषेला विशिष्ट स्थान प्राप्त करुन देण्यासाठी भाषेच्या व्याकरणाची गरज असते. संस्कृत भाषेचे व्याकरण हे स्वभावत:च जगातील आद्य व्याकरण आहे. प्राचीन ऋषिमुनींच्या संसर्गाने पावन झालेल्या या प्रचण्ड विस्तारयुक्‍त अशा संस्कृत व्याकरणाने जगातील अनेक लोकभाषांची व्याकरणे घडविण्यात आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. संस्कृत व्याकरणातील धातु, सूत्र, गण, उणादि व लिंग या पंचप्रांतांमध्ये जेवढे मूळग्रंथ, भाष्यग्रंथ, वार्तिक वा सम्मिश्रित रुपाने प्रक्रियाग्रंथ झालेत त्यातील सध्या उपल्बध ग्रंथांपैकी जास्तीत जास्त ग्रंथांचा सुदीर्घ अभ्यास करण्यात ज्यांनी आपले आयुष्य खर्च केले आहे तसेच ज्यांना सुषुम्नासदृशस्थानी ‘म्नि णो वा’ सदृश गूढ संकेतांचीही पुरेपुर जाण आहे त्या वैयाकरणांना परामाब्धि ग्रंथाचा व्याकरणदृष्टया अभ्यास दिव्य असा व्याकरणानंद प्रदान करेल. व्याकरणाचे अल्पाभ्यासक असोत, साधारण अभ्यासक असोत किंवा विस्तृताभ्यसक असो, त्या सर्वांना हे सुनिश्चितपणे कळून येईल की ‘परमाब्धि हा व्याकरणदृष्टयाही आनंदाने अमर्याद विहार करता यावा असा महासागरच आहे’. म्हणूनच या दृष्टिकोणातूनही परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • भाषेचे व्याकरण जाणून घेणे जेवढे गरजेचे तेवढेच शब्दांमधील सामर्थ्याचा पूर्णानुभव घेणेही गरजेचे असते. पूर्वग्रंथांमधील कित्येक शब्दांचा अनुचित वापर झाल्याने जातिधर्मपथाधारित तेढ निर्माण होऊन जगाला तज्जन्य भयानक संकटांनी वेढले आहे, अशांती माजली आहे. शब्दांच्या अनुचित वापराने निर्माण झालेली ही अशांती दूर करुन विश्वशांतीसाठी शब्दांचाच अंत:करणपूर्वक सुयोग्य आधार घेणे सर्वांना क्रमप्राप्त ठरले आहे. म्हणूनच परमाब्धिच्या शब्दाशब्दांमधील, वाक्या - वाक्यांमधील सत्सामर्थ्याचा परिपूर्ण उपयोग करुन घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • कर्मांमध्ये पुढे होणार्‍या परिपाकांना आधीच गूढपणे धारण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे विविध जातिधर्मपंथामध्ये विविध प्रकारची धार्मिक कर्मे केली जातात. बाह्यात: या कर्मांमध्ये भेद असले तरी धर्मविहित सर्व सत्कर्मांचा उद्देश साधारण: ‘स्व:करिता किंवा दुसर्‍यांकरिता शुभपरिणामांचा लाभ’ हाच असतो. सर्वजातिधर्मपंथांमधील कालौघात शिरलेल्या अनिष्ट वा निरर्थक कृतींना वर्ज्य समजून सर्व सत्कर्मांची सत्परिणामशीलता मानणे म्हणजेच जगातील सर्व वर्गांमधील लोकांनी कर्मक्षेत्रीय सैद्‌धान्तिक एकतेचा अनुभव घेणे होय. हे सर्वकाही समूळ समजण्यासाठी व मनात पूर्णत: रुजण्यासाठी सर्वांनी परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • सध्या जगात सत्कर्मांपेक्षा दुष्कर्मांचेच अतिशय प्राबल्य आहे, आधिक्य आहे. जगाची अशीच दुरवस्था अजून हजारो, लाखो वर्षे राहिली तरीही काही बिघडणार नाही, असा अविचार कुठलाही विवेकी माणूस करणार नाही. अतिप्रचण्डविध्वंसकबलसहित असलेल्या सध्याच्या अभूतपूर्व अशा आपत्कालस्थितीतून जगाची सुटका व्हावी, या इच्छेने प्रत्येक सन्मार्गशील व्यक्‍तीने प्रयत्‍नांची कास धरणे आवश्यक आहे. या प्रयत्‍नांचे निश्चित स्वरुप कळून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिप्रस्वादन करावे
  • संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे, हा परमाब्धिग्रंथाने आपल्या हृदयात जोपासलेला मूळ छंद आहे. या छंदासाठी काव्यदृष्टया या ग्रंथात भरपूर छंद त्यांच्या प्रकारोपप्रकारांसह उपयोजिले आहेत. पूर्वकालप्रकटीतून छंद असोत किंवा व्यवहारदृष्टया सद्य:कालस्वनिर्मित छंद असोत, सगळे छंद हे तत्त्वत: अनादिविचाराकाशात अनादिसिद्‌धच आहेत. विविध छंदांच्या अतिशय विस्तीर्ण क्षेत्राचा अभ्यास करण्याच्या छंदातही स्वच्छंदपणे रमता यावे, म्हणूनही परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • वाङ्‍मयनिर्मितीच्या क्षेत्रात प्राचीनकाळी रससंप्रदाय, अलंकार संप्रादय, रीतिसंप्रदाय, ध्वनिसंप्रदाय इत्यादी संप्रदाय उत्पन्न झालेत. या सगळ्या साहित्यक्षेत्रीय संप्रदायांचाही महासमन्वय परमाब्धि ग्रंथात झाला आहे, हे साहित्यशास्त्रवेत्यांना सहज समजून येण्यासारखे आहे. म्हणूनच साकल्याने अक्षर वाङ्‍मयानंदाचा दिव्यानुभव घेण्यासाठी ‘परमाब्धि:’ या विश्चधर्मग्रंथाचे प्रस्वादन करावे.
  • विश्वातील सर्वांसाठी कल्याणकारक धर्म म्हणजे विश्वधर्म होय. देहाहंताभावजन्य सर्व मनोधर्मांचा त्याग करुन सर्व सद्‍गुणधर्मांचा स्वीकार करणे म्हणजे विश्चधर्माचा स्वीकार करणे होय. विश्चातील सर्वांकडून पाळला जाणारा स्वधर्म हा समष्टिस्तरावर विश्वधर्म ठरतो. ‘स्थलकालपरत्वे प्राप्त कर्तव्य पालन’ हा व्यवहारदृष्टया स्वधर्म आहे व ‘देहभावात न रमता आत्मभावात रमणे’ हा पारमार्थिक दृष्टया स्वधर्म आहे, हे सर्वांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. जगातील सर्वच सर्वप्रकारचे धर्मबिंदू, सर्वप्रकारच्या धर्मरेखा, सर्वप्रकारची धर्मचक्रे, सर्वप्रकारचे धर्मरथ, सर्वप्रकारच्या धर्मनौका ज्या एकाच विश्वधर्माच्या अंतरंगात समाविष्ट आहेत त्या विश्वधर्माचे प्रतिपादन करणार्‍या परमाब्धि ग्रंथाचे सर्वांनी प्रस्वादन करावे.
  • सर्व जनकल्याणासाठी आवश्यक असलेला परमाब्धि हा ज्याप्रमाणे धर्मक्षेत्रातील सर्वच वर्गांना मान्य होणारा असा आहे, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षांनाही मान्य होणारा असाच आहे. जनहिताकडे सदैव लक्ष असलेल्या व सदैव जनहितकार्यदक्ष असलेल्या सर्वच राजकीय पक्षांकडून परमाब्धिग्रंथाचा स्वीकार होणे पूर्णत: स्वाभाविक आहे. जगात सर्वत्र मंगलमय असे सुराज्य यावे, अशी इच्छा विविध राजकीय पक्षांमध्ये वृदिधंगत होणे, हे जनहिताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. जगातील प्रत्येक माणूस आध्यात्मिक दृष्टया आपल्या हॄदयातील अखण्ड स्वाराज्याला (स्वराट्‍शासनला) भावनेच्या स्तरावर जरी ओळखू शकला तरी या भौतिक जगातही सहजपणे दिव्य सुराज्य येईलच. म्हणूनच या दृष्टीनेही प्रत्येकाने परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • धर्मकारण किंवा राजकारण हे जेंव्हा जेंव्हा प्रचण्ड प्रमाणात प्रदूषित होते तेंव्हा तेंव्हा त्यातून उद्‌भवणार्‍या युद्धांमुळे किंवा युद्धसदृश्य हिंसाचारांमुळे प्रचण्ड प्रमाणात जनधनहानी होते आणि अर्थकारण कोलमडते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला अतिशय डावीकडे किंवा अतिशय डावीकडे किंवा अतिशय उजवीकडे ओढण्याचे प्रकार जेंव्हा जेंव्हा अतिशय प्रमाणात घडतात तेंव्हा तेंव्हा अर्थकारण कोलमडते. हे सारे काही जगाने अनुभवलेले आहे. कोलमडलेल्या अर्थकरणाचे भीषण परिणाम सर्वसामान्यांनाही भोगावे लागतात. आर्थिक मंदी उद्योगजगताला त्रास देते व तिच्यातून उद्‌भवलेल्या बेरोजगारीरुपी कुर्‍हाडीचे घाव गरीबांच्या पोटांवर बसतात. अशी भयानक स्थिती पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून सावधानता बाळगण्याची फार गरज आहे. सर्वविध आर्थिक मुद्यांचा पूर्णत: सुयोग्य विचार नेहमी होत राहिल्यास व विविध वर्गांमधील कलह नष्ट करण्यासाठी सर्वांनी झटल्यास अर्थकारणाच्या दृष्टीनेही जगात सुवर्णयुग येणे शक्य होईल. म्हणूनच परमाब्धि ग्रंथ हा ‘वर्गसंघर्षनिरसनप्रयासमूलक, सर्ववर्गहितकारक, सत्पथजीवनमूल्याधारित, सर्वजनकल्याणकेंद्रानुवर्ती अर्थकारणाचे’ प्रतिपादन करतो. या सर्वोन्नतिमूलक अर्थव्यवस्थेचा परिपूर्ण व्यापक अर्थ समजून घेण्यासाठी परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • आर्थिक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे सुव्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातही सुव्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. संपूर्ण मानवसमाज हा विविध मुद्यांवरुन विभाजित झालेला आहे. विविध गटांनी ‘परस्परांशी विरोध व परस्परांच्या कार्यात अवरोध’ या दोन्ही गोष्टी मनातून झटपट हटविल्यास हे सगळेच गट विश्वपटावर एकाच मानवसंज्ञक गटात रुपान्तरित होऊ शकतात व ऐक्याचा महान्‌ आनंद अनुभवू शकतात. म्हणूनच सर्वांनी परमाब्धिप्रस्वादन करावे.
  • जगात सर्वांनाच आनंद उपभोगण्याची इच्छा असते. परंतु आनंद मिळविण्याच्या उद्देशाने अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. दुष्कर्मांमधील आसुरी आनंद भोगणे तर अनर्थमूलक आहे. आपापल्या अधिकारपरत्त्वे सत्कर्म, भक्‍ती, योग वा ज्ञानामुळे लाभणारा दिव्यानंद भोगणे असीमकल्याणरुपच आहे. म्हणून सर्व साधनामार्गांचाही अंतिमसाध्यैक्यदृष्टीने परमसमन्वय असणार्‍या ‘परमाब्धि:’ ग्रंथाचे प्रस्वादन करावे.