परमाब्धि: ग्रंथरचना

‘परमाब्धि:’ ग्रंथ हा दत्तगुरुंचे पूर्ण लक्ष असताना लिहून झालेला आहे. या विषयीची काही प्रमाणे इथे देतो.

  • स्वत:च्या मूळ पीठांमधील काही पीठनांवे दत्तगुरुंनी स्वत: सूचित केली.
  • इस्त्रायलमधील प्रेषित लोटाविषयी मी एक वाक्य लिहिले होते. त्याच अर्थाचे परन्तु थोडेसे शब्दान्तर करुन ते वाक्य लिहिण्याचे दत्तगुरुंनी सांगितले.
  • आनंदसम्प्रदायाच्या तीन शाखांच्या प्रवर्तक पुरुषांचा क्रम दत्तगुरुंनी ‘आनन्द, सदान्द व हरिपादानंद’ असा सांगितला.
  • दत्तावतारी महापुरुष तर अनेक आहेत. नवनिश्रयांमध्ये मला नवनांवे लिहावयाची होती. मी लिहिलेली नवनांवे ही दत्तगुरुंच्या इच्छेनुसार आहोत.

ही चार उदाहरणे झालीत. लेखनकाळी दत्तगुरुसान्निध्याचा अनेकदा विशेषरुपाने अनुभव आला आहे. त्यामुळे लेखनस्फूर्ती टिकून राहिली.

या ग्रंथात काय लिहिले जात आहे, याकडे अनेक दैवतांचे व अनेक प्राचीन महापुरुषांचे लक्ष होते. त्याचा मला अनुभव आला. वैदिक धर्मान्तर्गत विविध दैवतांचे दृष्टान्त, एका प्राचीन श्रमण महात्म्या़चा दृष्टान्त, एका अरबी प्रेषिताचा दृष्टान्त व अन्य अनेक भूतकालीन सन्तमहात्म्यांचे दृष्टान्त धर्मैकदृष्टया मला अनुभवसाक्षरुप आहेत

‘परमाब्धि:’ ग्रंथ मी जरी लिहिला असला तरी ग्रंथाच्या शब्दाशब्दात दत्तगुरुंचा पूर्ण आशीर्वाद आहे. माझ्या विषयी दत्तगुरुंची अत्यन्तविश्चासपूर्ण अशी भावना असल्यामुळे ग्रंथ पूर्णत्वास गेला. बुधवार दि. ७-७-२००४ ला दत्तगुरुंनी ‘परमाब्धि:’ ग्रंथाला जो आशीर्वाद दिला तो ऐकून मी स्वत:ला धन्य समजलो. आशीर्वादाचे शब्द आताच सांगण्यासाठी गरज नाही.

दत्तमाऊलींच्या कृपेने मी ‘परमाब्धि:’ ग्रंथ संस्कृत लिहिला आहे. परन्तु सर्वसामान्यांना कळण्याकरिता त्याचे मराठी भाषान्तर देखील स्वत:च केले आहे. कालौघात या ग्रंथाची विविध भाषांमध्ये भाषान्तरे होतीलच.

हा ‘परमाब्धि:’ ग्रंथ पूर्णत: नूतनरचनात्मक आहे. असंख्य नवनवीन विचारांच्या दिव्य लाटांमूळे हा मोदोत्फुल्ल आहे. सर्वजन कल्याणाकरिता असलेल्या अमर्याद बोधामृताच्या साठयामुळे अथांग पसरलेला आहे. अनेकानेक संज्ञारुपी बहुमूल्य रत्‍ने जगाला देत आहे.

हा ग्रंथ असंख्यकोटिपूर्वग्रंथातील साररुप आशयाला व समष्टिचित्ताकाशव्याप्त साररुप आशायाला स्वत:मध्ये स्वत:च्या अभिनव पद्धतीने सामावून घेऊन अनन्तकाळासाठी सत्यसिद्धांताचा महासागर बनला आहे.त्यासोबतच हा ग्रंथ दिव्यत्वाच्या महाशिखावर स्वत:मधील रचनाविशेषांचे अपूर्व असे गूढ अनन्तत्व देखील दर्शवीत आहे.स्वत:मधील भव्यत्त्वाच्या अपार व्याप्तींनी हा परीपूर्ण आहे.

धर्मादिप्रान्तांमधील अनेकानेक ज्वलन्त प्रश्नांचे सुयोग्य समाधान करुन हा ग्रंथ परमस्थानी विराजमान आहे.जगभरात विविध दृष्टीकोनातून बघितली जाणारी तथाकथित धर्मनिरपेक्षता आणि विविध रूपांमधील कट्टर धार्मिकवाद यातील भयानक संघर्षावर तोडगा सुचवून सर्वांना परमप्रेमात बोलावत आहे.विश्वव्यापक धर्माचे अनादिअनंत रहस्य उलगडवून दाखवीत आहे.प्रत्येकाच्या ह्दयात दिव्य पारमार्थिक साम्राजाची स्थापना करण्यासाठी प्रत्येक ह्दयाला सन्मानाने आमंत्रित करीत आहे.हा ग्रंथ म्हणजे सम्पूर्ण धर्मसृष्टीला व्यापून उरलेला वाक्सृष्टिरूप महासागर आहे.

‘परमाब्धि:’ या नांवाचा भावार्थ ’सर्वोत्त्म दिव्य महासागर’ असा आहे.सन्मार्गस्थांना याची जाणीव ग्रंथाच्या पठणानंतर अवश्य होईल. परन्तु ज्यांना दुर्गतीकडे जाण्याची अत्यन्त ओढ लागलेली आहे;किंवा जे दुर्गतीकडे जाणारच अहेत; त्यांना यासम्बन्धी खोटे आक्षेप सुचत राहिल्यास नवल नाही.परन्तु त्यांनीहि दुर्मती सोडून देऊन कल्याणाचा मार्ग धरावा.अहो,हा ग्रंथ म्हणजे दत्तगुरुकृपेमुळे मला निर्मिती करता आलेला असीम कल्याणाचा परमस्त्रोत आहे.

दत्तगुरुंचे ऋण मी कसे फेडणार ? ऋण फेडणे शक्यच नाही. दत्तगुरुंच्या चरणकमलांवर अत्यन्त नम्र प्रेमाश्रूंचा संततधार अभिषेक करणेच फक्‍त घडू शकते.