॥ स्वानुभव ॥

सम्पूर्ण विश्वाकरिता स्वत: एक धर्मग्रंथ लिहावा अशी माझी तीव्र इच्छा होती. ’परमाब्धि:’ ग्रंथाच्या लेखनाने ती इच्छा पूर्ण झाली आहे. आज जगात अनेक धर्ममत, संप्रदाय आहेत.त्यामुळे असंख्य धर्मग्रंथ आहेत.आपापल्या धर्मग्रंथाचा वाटेल तसा आधार घेऊन लोक परस्परांशी कलह करीत आहेत.धर्माचे रह्स्य कलहकर्त्यांना समजेनासे झाले आहे.अधर्म बोकाळ्ला आहे.सामान्य जनता देखील त्यामुळे विभ्रान्त झाली आहे.विश्वाचा धर्म कोणता, हे समजून घेणे आवश्यक बनले आहे.त्यामुळे वैश्चिकधर्म ग्रंथाची निर्मिती होणे आवश्यक होते. ’परमाब्धि:’ ग्रंथाच्या लेखनाने ते माझे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

आज पर्यन्त स्वत:विषयी मी जास्त काही सांगितले नाही. लोक बरीच कांही माहीती विचारत.परन्तु मी अत्यंत थोडी माहीती सांगायचो; किंवा कधी कधी कांहीहि सांगत नसे. बर्‍याच जणांना माझ्या विषयी जाणून घ्यायची तीव्र इच्छा असायची. परन्तू स्वत:ला अधिकाधिक अलिप्त ठेवण्याच्या माझ्या स्वभावामुळे ते त्यांना शक्य होत नसे. परन्तु या ’परमाब्धि:’ ग्रंथाच्या निमित्त्याने आता स्वत:च्या जीवनाविषयी थोडेसे सांगत आहे.

२३-७-८७ ला मथुरेला गेलो. मथुरा, गोकुळ,वृंदावन इत्यादी पवित्र परिसर पुन्हा पुन्हा न्याहाळून पाहिला.अनेकानेक साधूंच्या आश्रामात गेलो.सातदिवस पवित्र व्रजभूमीत घालाविल्यानंतर हरिद्वारला गेलो.तिथे गंगेच्या मनोहर दर्शनाने मन अत्यन्त प्रसन्न झाले. महामण्डलेश्वर त्यागमूर्ती श्री स्वामी गणेशानंद पुरीजी महाराजाच्या कनखल येथील साधनासदन आश्रमात राहीलो.आश्रमात असताना महाराजांच्या मुखातून काही उपनिषदांचे श्रवण घडले.हरिद्वारला असतानाच एका महात्म्याकडून कांही योग क्रिया शिकत होतो.हरिद्वारमधील अनेक धर्मशील साधूची उपस्थिती माझ्या मनाला प्रसन्नता प्रदान करीत होती.हरीद्वार-ऋषिकेश मधील विविध स्थानी जाऊन आल्याने समाधान वाटले.२-८-८७ ते २४-१२-८७ हा हरिद्वारमधील निवासकाळ.

नित्यशुद्ध असे निजस्वरुप जन्ममृत्युरहित आहे. असे असताना देखील वैशाख शुद्ध दशमी दि.२०/०५/१९६४ ला जन्मगांवी जन्माला आलो. निज स्वरुपाला कोणतिही जाती नाही. परन्तु जन्म घ्यायचा म्हटल्यावर कोठल्या तरी जातीचा सम्बन्ध येतो.परन्तु मानव जातीसह सर्व जीवजाती अध्यस्त आहेत.सर्व प्राणधारक तत्त्वत: निजस्वरुपच आहेत.यावेळी माझा देह भृगुवंशात जन्मला असला तरी मूलैक्यदृष्ट्या सर्ववंशांना मी माझेच समजतो. सर्व मानवांच्या हितातच माझे हित आहे.

भगवान दत्तात्रेयांचे लक्ष माझ्याकडे आरंभापासून होतेच.परन्तु वयाच्या पंधराव्या वर्षी दत्तगुरुंनी आपल्या विशेषकृपाकक्ष्येत ओढून घेतले.त्यानंतर दोन वर्षे ज्या घटना घडल्या त्या विस्मयकारक होत्या. तोहि काळ विचित्रपणे गेला.

लहानपणापासुनच मला अनेक साधुसंतांचा सहवास लाभला होता.त्यामुळे व मूळस्वभावामुळे एकांतसेवनाकरिता गृहत्यागाची वारंवार इच्छा होत होती.परन्तु लौकिकदृष्ट्या लौकिक शिक्षण होऊ द्यावे; अशी दत्तगुरुंच्या मनी इच्छा उपजल्याने त्या कार्यात काही काळ गेला.परंतु हे सर्व चालू असताना अवतीभोवती बघत होतो.जगभरातील अनेकानेक धर्ममतसम्प्रदायांच्या आजच्या स्थितीचा विचार करीत होतो.विविध धर्ममतांतील लोक आपल्या ग्रंथातील कोठल्या वचनांचे अयोग्य अर्थ लावून जगात हिंसक वातावरण निर्माण करीत राहतात; याचा विचार करीत होतो.विविध धर्मग्रंथातील मूळ भाग कोणता, याचाहि विचार करीत होतो.या जगात राह्त असणा‌र्‍या विविध मतावलंबियांच्या विचारांचा विचार करण्यासाठी त्यांचे असंख्य ग्रंथ डोळ्याखालून घालत होतो.शेवटी गृह्त्याग घडला व विचार करता करताच १९८७ साली पुण्यनगरी पुण्याला येऊन पोहोचलो.

एके दिवशी पुण्यात प्रसिद्ध असलेल्या सारसबागेतील गणेश मंदिरात बसलो होतो.अचानक एक तेजस्वी महात्मा आला. त्याने मला अगदी थोडेसे सांगितले व तो महात्मा अद्दश्य झाला.त्यानंतर आळंदी, भामगिरि इत्यादी स्थानी थोडासा काळ घालविला व पुढील प्रवासाचा बेत आखला.

एकान्तात राहण्याची तीव्र इच्छा होऊ लागली.परन्तु एकान्ताऐवजी प्रथम गजबजलेल्या दिल्लीत येऊन थडकलो.दिल्लीतील श्रीकृष्णानिवास आश्रमात २४-१२-८७ पासून २-१-८८ पर्यन्त राहीलो.दि.२७-१२-८७ ला दत्तगुरुंचा पहाटे पाच वाजता एक अतिविशेष स्वप्नदृष्टांत झाला.दत्तगुरुंनी मला माण्डीवर घेऊन व डोक्यावर हात ठेवून जे सांगितले ते त्यांच्याच शब्दात असे ’आज मी वाराणसीमधून येत असताना भगवान शंकरांनी मला तुझ्याकडे जाउन तुला अनुग्रह देण्याविषयी सांगीतले आहे.आता तू (अमूक) साधना कर. वेळ वाया घालवू नको.इत्यादी इत्यादी’

दैवतांच्या विश्वात आधीच एक योजना तयार असते.त्यानुसार कालोघात घटना घडत असतात.काहीजणांच्या बाबतीत कोणाचा अनुग्रह होणार हे ठरलेले अस्त.दत्तगुरुंचा अनुग्रह हा माझ्याकरिता दैवतसृष्टीकडून व नियतीकडून ठरलेला होता.या स्वप्न दृष्टांतामूळे दत्तगुरुंच्या साक्षात दर्शनाची मला ओढ लागली. दयासागर दत्तगुरुंनचे विशेष दर्शन लाभावे व पुन्हा पुन्हा डोळे भरुन पहावे,अशी आन्तरीक इच्छा होती.त्याकरीता एकान्तातील साधनेची आवश्यकता होती.

दि.३-१-८८ ला सुवर्णपालेश्वर डोंगरावर येऊन पोहोचलो.एकमेकांशी एक विशिष्ट कोण साधलेल्या दोन भागांमध्ये हा डोंगर पसरलेला आहे.त्यामुळे याला कोणाचल असे देखील म्हणावेसे वाटते. तिथे अनुष्टानांकरिता अतिशय एकान्तात डोंगरमाथ्यावर एक पर्ण कुटी बांधली होती.अनुष्ठानांमध्ये ज्या कांही घटना घडल्या त्यातील काही प्रमुख घटना पुढीलप्रमाणे आहेत.

  • गुरुवार दि.१-१२-८८ ला जे घडले ते असे. पहाटे मी झोपेतून उठून अंथरुणावर उभा होतो व स्नानाकरिता खाली जाणार होतो,एवढयात वीणाधारक एक ऋषी कुटीत प्रकट झाले.त्यांनी मला अलिंगन दिले व त्या कुटीतच अन्तर्धान पावले.हे सर्व अत्यन्त वेगाने घडले.
  • दत्तगुरुकडून मला एक मंत्र आधीच मिळाला होता. परन्तु दत्तगुरुंची साक्षात कृपादृष्टी माझ्यावर अधिकाधिक पडावी,म्हणून मी अट्टहास करीत होतो.पर्णकुटीमध्ये गुरुवार दि.३१-१-९१ ला रात्री ९ वाजता तीन तेजोमय मुखे माझ्या दृष्टीपुढे प्रकट झालीत.साधारणत: दत्तगुरु एकमुखी स्वरुपात दर्शन देत.असतात;परन्तु क्वचितप्रसंगी ते त्रिशीर्षरुपहि दर्शवितात; याचे हे उदाहरण. या घटनेनंतर काही दिवसांनी डोंगरावरील एका भागावर मी उभा असाताना समोरच्या भागावर पुन्हा दर्शन घडले होते.
  • रात्री शंख नाद करणे,सर्पादिकांच्या रुपाने पर्णकुटीत येणे व राहणे; इत्यादि अनेक प्रकार अनुष्ठानकाळात घडत असत.

सुवर्णपालेश्वर डोंगरावर साडेतीन वर्षे राहिलो.तिथे ब‍‌र्‍याच वर्षापासुन स्वामी गोपालानन्दजी महाराजांचे वास्तव्य आहे.त्या डोंगरावरील आश्रमाच्या विकासाकरीता त्यांनी आजवर पुष्कळ श्रम घेतेलेले आहेत.अन्य काही साधूंचेहि तिथे येणे-राहणे-जाणे चालू असते.असो.१४-६-१९९१ ला मी सुवर्णपालेश्वर डोंगराचा भावपूर्ण अन्त:कणाने निरोप घेतला व काही तीर्थयात्रा करुन पूर्वदृष्टांतानुसार १ जुलै १९९१ ला आडी डोंगरावर येऊन पोहोचलो.

आडीचा डोंगर हा ’संजीवनगिरी’म्हणून ओळ्खला जातो. या डोंगराच्या माथ्यावर मल्लिकार्जुन मंदिर व भ्रम्रराम्बिका मंदिर आहे.याच डोंगराच्या ऊत्तरेअकडील बाजूला मध्यभागी दत्तमंदीर आहे.दत्तमंदीरात वास्तव्य केले.या डोंगरावर आल्यानंतर अनेक दृष्टांत झाले आहेत.त्यापैकी महर्षी भृंगुचा एक अत्यन्त महत्त्वपूर्ण दृष्टांत होता.इथे केलेल्या दोन अनुष्ठानांविषयी आता थोडेसे लिहितो.

१६-२-९२ ते २४-५-९२ पर्यंत सव्वा तीन महीन्याचे एक अनुष्ठान झाले.पूर्वीच्या अनुष्ठानांमध्ये काही दिवस केवल पानी पिऊन राहणे, काही दिवस फ़लाहार करुन राहणे इत्यादि प्रयोग झाले होते.परन्तु या अनुष्ठानात काही दिवस पाणीहि पूर्णपणे वर्ज्य केले होते.त्यामुळे सर्वांगाचा अत्यन्त दाह होत होता. क्षणभर सुद्धा स्वस्थता नव्हती.असे चार दिवस निर्जल अवस्थेत काढल्यानंतर रात्री १० ते ११ च्या सुमारास मंदीरात जाऊन बसलो.प्राण गळ्यापर्यन्त येऊन कसातरी थांबत होता; खरेतर प्राण शरीरात निघून जाण्याच्या बेतात होता; परन्तु एका अदम्य आशेने तो थांबला होता;तेवढयात दिव्यतेजोमय स्वरुपात दत्तप्रभू पुढे प्रकट झाले व थोडयाच वेळात अन्तर्धान पावले.

दत्तगुरुंचे माझ्याकडे लहानपासूनच लक्ष होते; त्यांचे मार्गदर्शन होते.तरीसुद्धा मला एवढे कठोर प्रयोग करण्याची का गरज पडत होती? त्याचे कारण एकच होते; आणि ते म्हणजे ’’ माझ्याकडून अत्यन्त थोडीशी का होइना तपस्या घडावी; हा दत्तगुरुंचा अन्तरंग हेतु ’’.कायिक, वाचिक व मानसिक तपाचे एक महत्त्व सांगितले जात असते.आपल्या ऋषीमुनिदेवादिकांनी त्याचा जो आदर्श घालून दिलेला आहे;त्या आदर्शाच्या महानतेला मी मन:पूर्वक प्रणाम करीत होतो.अनुष्ठान आटोपल्यानंतर काही तीर्थाचे ठिकाणी जाऊन येणे घडले.त्यानंतरचा काही काळ अध्ययनादिकांत गेला. परन्तु ’दत्त’ हाच मला एक ध्यास होता.त्यामुळे पुन्हा २४-३-९३ ला अनुष्ठान आरंभ केले. मागील काही अनुष्ठांनाप्रमाणे या अनुष्ठातही मौन पाळले होते.त्या काळात अनेकानेक अनुभव आलेत.विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे दत्तगुरुंनी पूर्वी ठरविल्यानुसार श्रावण शुद्ध पंचमी दि.११-८-१९९४ ला दिव्य अनुग्रह प्रदान केला.मस्तकावर हात ठेवून कानात मंत्र सांगितला.जवळपास सहा सात वर्षे मी दत्तगुरुंच्या दिव्यानुग्रहाकरिता धडपडत होतो; अनेक कष्ट सहन करीत होतो; उपोषणादिकाद्वारे देहदण्डहि सोसत होतो;प्रसंगाविशेषी मरणप्राय यातना सहन करत होतो;विशेष कृपाप्राप्तीसाठी पुन्हा पुन्हा तळमळत होतो.शेवटी साध्य साध्य झाले.हे एवढे मी कशासाठी करीत होतो? वैश्विक धर्मग्रंथाच्या लेख्ननाकरीता अधिकार प्राप्त व्हावा म्हणून.विविधधर्ममत सम्प्रदायांमध्ये दत्तगुरुंना मानणारे लोक आहेत. दत्तगुरु हे समन्वय स्वरुप आहे.त्यादृष्टींने दत्तानुग्रह मिळवणे मला महत्वाचे वाटत होते.त्यानंतर काहीकाळ अनुष्ठान पुढे चालु ठेवून ६-१०-१९९५ ला एकूण अडीच वर्षाच्या अनुष्ठानाची समाप्ती केली.विविध अनुष्ठान काळात श्री देवीदास महाराजांनी मन:पूर्वक सेवा केली.त्याच्यांत सेवाभाव चांगला आहे.आश्रमाची नियोजनात्मक जबाबदारी ते चागंल्यारीतिने पार पाडतात.परिसरस्थ गांवातील काही मंडळीनी देखील चांगले सहकार्य केले. अनुष्ठान पुर्ण झाल्यावर २६-१०-१९९५ ते ३-१०-९५ पर्यन्त तीर्थ यात्रा केल्या अंदाजे चाळीस तीर्थांवर जाऊन आलो. त्यापैकी गरुडेश्चर व गिरनारला असताना विशेष अनुभव आला. गरुडेश्वरला असताना रात्री नर्मदातीरी एकान्तात जाऊन बसलो होतो. अकरा वाजले होते. काठावर अन्य कोणीही नव्हते. अचानक दत्तगुरु तिथे प्रकट झाले व मला म्हणाले ‘यहॉ क्या कर रहे हो ?’ मी प्रणिपात केला व आपण कोठून आलात म्हणून विचारले. तेंव्हा ‘भारत चीनसह सर्व राष्ट्रांमध्ये माझा संसार असतो....’ इत्यादि कांही बाबी दत्तगुरु बोलले व अदृश्य झाले. मी हि उठलो व खोलीवर जाऊन झोपी गेलो.

गिरनारला असताना एकदिवस जंगलात फिरलो. दोन अतिशय वृद्ध अशा सत्पुरुषांचे दर्शन घडले. त्यानंतर दत्तशिखरावर येऊन कमण्डलूकुण्डावर गेलो. तेथून अशा एका गुहेत जाऊन राहिलो की, जिथे दिवसासुद्धा कोणीहि माणसे येत नाहीत. चार दिवस त्या दुर्गम गुहेत राहिलो. त्या काळात एकेदिवशी दत्तगुंरुनी जे सांगितले ते अत्यन्त महत्वाचे होते. गिरनारहून पुढे अन्य काही तीर्थ क्षेत्री जाऊन आडीला परत आलो.

दत्तगुरुंनी माझे ‘परमात्मा’ असे दीक्षोत्तर नामकरण केले होते. ‘परमात्मराज’ हे नांव देखील स्वत:करिता वापरु शकतो; असे कालान्तराने त्यांनी सांगितले. अनेकांची अनेक नांवे मोठमोठया अर्थाची असतात; परन्तु मी मात्र निन्दक टवाळखोरांच्या संभाव्य त्रासाला टाळत होतो. त्यामुळे स्वत:चे नांव लवकर प्रकट करण्याची इच्छा झाली नाही. आपल्याकडून एखादे वाङ्‍मयीन कार्य झाल्यावरच हे नांव जाहीर करावे, असे मनाशी ठरविले. ‘परमात्मराज’ हे नांव धारण करुन ‘परमाब्धि:’ हा ग्रंथ लिहिला व या माध्यमातूनच या नावाचे आता प्रकटीकरण होत आहे. आतातरी हे नांव प्रकट करावे, अशी दत्तगुरुंची तीव्र इच्छा व आज्ञाहि आहे.

१९९६ पासून आतापर्यन्तचा काही काळ बान्धकामादिकांकडे लक्ष देण्यात गेला; तत्सम्बन्धित जोडणी करण्यात गेला. काही काळ वार्षिक दत्तजयंती महोत्सवाच्या संयोजनादिकार्यात गेला. (त्यातहि सन १९९९८ ला दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव व २००० साली लक्षदीपाराधन महोत्सव विशेषत्वाने झाला. त्यानिमित्याने काही अधिककाळ व्यतीत झाला.) काही काळ प्रत्येक पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने प्रवचनादिकार्यक्रमांमध्ये व्यतीत झाला. काही काळ अन्य गांवी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्यात व्यतीत झाला. कांही काळ तीर्थयात्रांमध्ये गेला. काही काळ विद्यार्थ्यांना न्यायवेदान्त व्याकरणादि विषय शिकविण्यात गेला. काही काळ असंख्य लोकांच्या असंख्य समस्या ऐकून घेण्यात व त्यातून जमेल तसा मार्ग काढण्यात गेला. काही काळ नित्यानैमित्तिक कर्मामध्ये, साधनेमध्ये व विश्रांतीत गेला. राहिलेला वेळ दत्तकृपेने ‘परमाब्धि:’ ग्रंथरचनेमध्ये गेला.