🪷🌼 रस्याव 🌼🪷
'रस्याव' ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत
रस्याव हा अध्यात्ममार्गक्रमणासाठी अत्यंत साहाय्यकारी असा ग्रंथ आहे. अध्यात्ममार्गाच्या आरम्भापासून साध्यस्थळापर्यन्तचा आवश्यक असा सगळा भाग अन्तर्भूत असलेला हा रस्याव ग्रंथ सर्व परमार्थपथिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. व्यावहारिक क्षेत्राप्रमाणेच आध्यात्मिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या अनेकानेक समस्यांच्या निराकरणासाठी या ग्रंथाचा भाविकांनी नेहमी अभ्यास करीत राहणे अतिशय हिताचे ठरेल. पारमार्थिक क्षेत्राप्रमाणेच व्यावहारिक दृष्टिकोणातूनही हा ग्रंथ मनुष्य जातीसाठी आत्यन्तिक हितकारी ठरेल.
मनुष्याच्या विचार करण्यात व वागण्यात अशा काही बाबी असतात की त्या पुष्कळदा परिवारातील इतर सदस्यांच्या लक्षातही येत नाहीत. परंतु त्या काही बाबी त्या व्यक्तीची, परिवाराची तसेच इतरही संबंधितांची मोठी हानी करण्याला कारणीभूत ठरू शकत असतात. तशी हानी टाळण्याच्या दृष्टिकोणातून तशा हानिकारक बाबींचे निराकरण करण्यासाठीचे अतिशय महत्वपूर्ण मुद्दे या ग्रंथात भाविकांना अत्यन्त सोप्या भाषेत वाचायला मिळतील.
सर्व जातिधर्मपंथांमधील भाविकांना या रस्याव ग्रंथाचे वाचन सुदिव्य आनन्द प्रदान करीत राहील. या ग्रंथातील परमार्थपथपोषक रसांचा आस्वाद सर्व भाविकांच्या अंतःकरणांना नेहमी आध्यात्मिक दृष्ट्या रसयुक्त ठेवत राहील.' रस्याव' या ग्रंथनामाचे विविधार्थ ग्रंथात दिले आहेतच. ते विविधार्थ लक्षात आल्याने सर्व भाविकांच्या मनाला अतिशय प्रसन्न वाटेल.
या "रस्याव" ग्रंथातील सुबोध पारमार्थिक कल्याणासाठीचा मोठा उठाव करण्याला भाविकांना भाग पाडेल. विविध धार्मिक परम्परांशी संबंधित उदाहरणे ही सर्वच वर्गांमधील लोकांमध्ये या ग्रंथाविषयीसुद्धा प्रचण्ड आत्मीयता निर्माण करेल, परमाब्धि, सत्पोष, महोन्नय, वर्तेट इत्यादी ग्रंथांप्रमाणेच या रस्याव ग्रंथाचाही अधिकाधिक उपयोग भाविकांकडून होत राहील, असा दृढ विश्वास आहे.
रस्याव ग्रंथाच्या अन्तरंगात सर्वजातिधर्मसंप्रदायांमधील भाविकांना मान्य होईल असे विशुद्ध अध्यात्म आहे. सर्व वर्गांमधील भाविकांनी नेहमी आस्वाद घेत राहावा असा विशुद्ध सुबोधरस या ग्रंथात आहे.
हा रस्याव ग्रंथ धार्मिक क्षेत्रान्तर्गत विविध सांप्रदायिक धारांमधील लोकांना अतिशय आनन्द प्रदान करीत राहीलच. याशिवाय मानसशास्त्रान्तर्गत तसेच साहित्य क्षेत्रान्तर्गत असलेल्या विविध सम्प्रदायांच्या अभ्यासकांना सुद्धा या ग्रंथाच्या वाचनाने अतीव आनंदाची अनुभूती येईल.
आध्यात्मिक क्षेत्रासंबंधाने ज्या काही मुद्द्यांविषयी जनमनांमध्ये संभ्रम असतात ते संभ्रम या ग्रंथाच्या वाचनाने दूर होतील. नामसाधर्म्यजन्य अनेकानेक गोंधळ मनातून दूर करण्यासाठी या ग्रंथाच्या वाचनाचा भाविकांना फार मोठा उपयोग होईल. एकच नांव असलेल्या काही तीर्थस्थळांविषयी जनमनांमध्ये कधी कधी संभ्रम आढळून येतात. तशा संभ्रमांचे निराकरणही या रस्याव ग्रंथात भाविकांना आढळेल. अशा प्रकारे अनेक प्रचलित विभ्रमांच्या निरसनामुळे जनतेला अनेकानेक मुद्द्यांविषयी सत्य काय आहे ते समजून येईल.
व्यतिभार म्हणजे काय, व्यतिगण्ड म्हणजे काय, विम्राद म्हणजे काय इत्यादी पुष्कळशा मुद्द्यांविषयी भाविकांना कळून येईल. व्यतिभार, व्यतिगण्ड इत्यादींचे प्रकार, त्यांच्या निराकरणाचे उपाय इत्यादी मुद्दे सुविस्तृतपणे या ग्रंथात भाविकांना वाचायला मिळतील.
अतिप्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत घडलेल्या विविध घटनांच्या माध्यमातून आध्यात्मिक विषयांसंबंधीचे स्पष्टीकरण या रस्याव ग्रंथात आढळून येईल.
परमार्थमार्गाकडे वळण्यापासून साध्य मिळण्यापर्यंतच्या प्रवासातील विविध अत्यावश्यक बाबींचे दर्शन घडविणारा हा रस्याव ग्रंथ असल्याने सर्व वर्गांमधील भाविकांमध्ये या ग्रंथाच्या वाचनाची गोडी वाढत राहील.
परमाब्धि, सत्पोष, महोन्नय, वर्तेट, सिध्रेण इत्यादी ग्रंथांचा ज्याप्रमाणे भाविकांनी अत्यंत आनंदाने स्वीकार केला तसाच स्वीकार या रस्याव ग्रंथाचाही होईल, असा पूर्ण विश्वास आहे.
[ रस्याव ग्रंथ प्रकाशन तिथी - आषाढ शुक्ल सप्तमी शक १९४३ (दि.१६/७/२०२१) ]
♦ Get In Touch ♦
Shree Datta Devasthan Math, Adi