🌸🌼 तन्वास 🌸🌼
'तन्वास' ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत -
तन्वास या ग्रंथाचे प्रकाशन कार्तिक पौर्णिमा या पवित्र पर्वकाळी झाले आहे. कार्तिक पौर्णिमेला मंदिरांमध्ये अनेकानेक दीप प्रज्वलित करण्याची एक परम्परा चालत आली आहे. अशा या प्रकाशपर्वकाळी पुष्कळशा सुबोधदीपांनी युक्त असलेल्या तन्वास ग्रंथाचे प्रकाशन होणे हा सर्व भाविकांच्या दृष्टीने महन्मंगल असा सद्भाग्यवर्धक योग आहे. सुबोधदीपांमुळे सर्वांचे अन्तःकरण सत्प्रकाशयुक्त होणे नेहमीच महत्त्वाचे असते. तसे घडल्यास सुबोधप्रकाशपर्वाचा आयुष्यभर भरपूर आनन्द घेता येत असतो.
तन्वास ग्रंथामध्ये पारमार्थिक क्षेत्रीय पुष्कळशा अतिशय रहस्यमय मुद्यांचे विस्तृत स्पष्टीकरण आहे. पूर्वी जे काही मुद्दे अत्यन्त संक्षेपात व अत्यन्त गूढरूपात माण्डण्यात आले होते त्या काही मुद्यांचे अतिशय खुलासेवार वर्णन या ग्रंथात वाचकांना वाचायला मिळेल. याशिवाय व्यावहारिक जीवनात ज्या काही समस्या निर्माण होत राहतात त्या निर्माणच होऊ नये किंवा झाल्याच तर त्यांचे निराकरणही व्हावे, या दृष्टिकोणातूनही तन्वास ग्रंथाचे वाचन सर्वांसाठी अत्यन्त हितावह ठरेल.
सर्वसामान्य जनांपासून विविध क्षेत्रांमधील प्रगाढ अभ्यासकांपर्यन्त सर्वांनाच आवडेल, असा हा तन्वास ग्रंथ आहे. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, वाणिज्य, भाषाशास्त्र, कृषिशास्त्र इत्यादी अनेकानेक शास्त्रांपैकी कुठल्याही शास्त्राचे किंवा त्या शास्त्राच्या कुठल्याही शाखेचे अभ्यासक असोत त्या सर्वांमध्ये पारमार्थिक मार्गाविषयीची आवड अधिकाधिक प्रमाणात वाढविण्याचे कार्य हा तन्वास ग्रंथ करीत राहील.
पुष्कळशा भाविकांनी आतापर्यन्त परमाब्धि, सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव इत्यादी ग्रंथांचा अत्यन्त प्रसन्न अन्तःकरणाद्वारे आस्वाद घेतलेला आहेच. परन्तु काही अत्यन्त रहस्यमय असे नवे नवे विषय जास्त विस्ताराने समजावेत, विविध क्षेत्रांमधील विविध उदाहरणांच्या माध्यमातून ते विषय अधिकाधिक सुस्पष्टपणे कळत राहावेत, अशी पुष्कळशा भाविकांची इच्छा असते. त्यामुळे आता भाविकांसाठी विविध जीवनावश्यकविषयरूप खास मेजवानी घेऊन हा तन्वास ग्रंथ आला आहे. अनेकानेक महत्त्वपूर्ण सिद्धान्त भाविकांना समजत राहावेत व विविध दृष्टान्तांच्या माध्यमातून त्या सिद्धान्तांचे भाविकांच्या बुद्धीमध्ये स्थिरीकरण व्हावे, हाच तन्वास ग्रंथाच्या अन्तःकरणातील एक पवित्र ध्यास आहे. सगळे भाविक या तन्वास ग्रंथाचे अन्तरंग समजून घेण्याचा प्रयास करतील, असा पूर्ण विश्वास आहे.
[ तन्वास ग्रंथ प्रकाशन तिथी - कार्तिक पौर्णिमा शक १९४४ (दि.७/११/२०२२) ]
♦ Get In Touch ♦
Shree Datta Devasthan Math, Adi