About Paramabdhi

समुद्र हेच युगानुयुगे वर्षत राहणार्‍या सर्व परिष्कुन्दांचे म्हणजे मेघांचे समुद्‍भव स्थान असते. तसेच समुद्र हेच सर्व परिष्यन्दांचे (नद्या, उपनद्या, झरे इत्यादींचे) समुध्रवस्थान म्हणजे मिलन दृष्ट्या सुस्थिर होण्याचे स्थान असते. यातील रहस्य समजून घेतल्यास सर्वांनाच हे सुस्पष्टपणे कळून येईल की - ‘युगानुयुगे वर्षत राहण्याचे सामर्थ्य असलेल्या सर्वविध दिव्यविचारमेघांचे परमाब्धिमध्ये गूढ वास्तव्य आहे. तसेच सर्व विशिष्ट धर्ममतसंप्रदायरुप नद्यादिकांचेही परमाब्धिमध्ये गूढ वास्तव्य आहे. हे निवासरहस्य प्रत्येकाच्या हृदयात दृढमूल होण्यासाठी प्रत्येकाने परमाब्धिपरिक्रीडन करावे.

  • लौकिक मेघ, लौकिक नद्या, लौकिक समुद्र हे सगळे जीवांसाठी अत्यंत उपयोगी आहेतच. परन्तु ते कधीकधी अत्यंत क्षुब्ध झाल्यास प्रचण्डहानिकारकही ठरु शकतात. परन्तु ‘परमाब्धि:’ हा सर्वांसाठीच अलौकिक समुद्र असल्याने हा सर्वकाळी सर्वांकरिता नित्यकल्याणकारकच आहे. म्हणूनच सर्वत्र ज्ञानप्रकाशयुक्‍त, सर्वत्र प्राणसंचारयुक्‍त असलेल्या या परमाब्धिमध्ये सर्वांनी निश्‍चिंतपणे, सुस्थिरचित ठेवून परिक्रीडन करावे.
  • असंख्य चित्तांमधील विषमत्त्व संपून जगात सर्वत्र परिषमत्व (परिपूर्ण समत्व) यावे. यासाठी परमाब्धिविचारांद्वारे आपापल्या चित्तभूमीचे परिषेचन (परिपूर्ण सिंचन) होणे गरजेचे आहे. या कार्यात निष्णात होण्यासाठी परमाब्धिमध्ये परिष्णात (परिपूर्णत: स्नात) होणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • परमाब्धसंबंधाने जीवांच्या हृदयात कल्याणकारिणी इच्छा ही विविध नामरुपांनी विहार करु शकते. उदाहरणार्थ - परमाब्धिसिष्णासा म्हणजे परमाब्धिमध्ये स्नान करण्याची इच्छा. परमाब्धिपिपठिषा म्हणजे रमाब्धिपठण करण्याची इच्छा. परमाब्धिबुभुत्सा म्हणजे परमाब्धिला जाणून घेण्याची इच्छा. परमाब्धिचिचोतिषा म्हणजे परमाब्धिचिंतन करण्याची इच्छा. परमाब्धिरिरसयिषा म्हणजे परमाब्धितील बोधामृताचा आस्वाद घेण्याची इच्छा. परमाब्धिसंयुयुक्षा म्हणजे परमाब्धिशी पूर्णत: संलग्न होण्याची इच्छा. परमाब्धिसंतितृप्सा म्हणजे परमाब्धिद्वारे संतृप्त होण्याची इच्छा. अशाप्रकारे या विविध नावांनी बागडणार्‍या इच्छा चमत्कारिकपणे परस्परसंयुक्‍त होऊन ‘परमाब्धिपरिचिक्रीडिषा’ या नावाने एकच रुप देखील धारण करु शकतात. परमाब्धिपरिचिक्रीडिषा म्हणजे परमाब्धिमध्ये परिक्रीडन करण्याची इच्छा होय. या कल्याणकारिणी इच्छेच्या परिपूर्तीसाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • धर्मदृष्टया इष्ट इच्छा या इष्टत्त्वाकडे नेतात तर अनिष्ट इच्छा अनिष्टत्त्वाकडे नेतात. जगात दुसर्‍यांना दु:ख देण्याची इच्छा (दुदूषा) भरपूर प्रमाणात आहे. दुसर्‍यांचा द्वेष करण्याची इच्छा (दिदिवक्षा) ही तशीच आहे. गुरुद्रोहधर्मद्रोहादि विविधद्रोह करीत राहण्याची इच्छा (दुध्रुक्षा) तसेच सामाजिक वातावरण शिवीगाळींद्वारे सातत्याने दूषित करण्याची इच्छा (दुदुक्षा) जगात तीव्रस्वरुपात दिसून येत आहे. परन्तु या सगळ्या दुरिच्छा दुष्कर्म करायला लावून दुर्गतीकडेच नेत असतात. म्हणून या सगळ्या वाईट इच्छांचे अंत:करणातून पूर्ण निर्मूलन करण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • परमाब्धितील परिक्रीडा ही शाश्वतविजयदायिनी, शाश्वतानंददायिनी आहे, सर्वेष्टक्रीडास्वरुपिणी आहे. परन्तु भवाब्धितील क्रीडा ही तीव्रदु:खदायिनी आहे. तरीसुद्धा भवाब्धिबिभ्रमिषा (भवसागरात गटांगळ्या खात राहण्याची इच्छा) मनुष्यामध्ये वास करीत असेल तर ते अनिष्ट लक्षण होय. भवाब्धितितीर्षा (भवसागर तरुन जाण्याची इच्छा) उत्पन्न होणे हे सद्‍भाग्याचे लक्षण आहे. व ती शुभेच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्‍नरत राहणे हे अत्युत्तम सद्‌भाग्याचे लक्षण आहे. म्हणून सर्वांनी भवाब्धितितीर्षा (मुमुक्षा) आपल्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्‍न करावा व या इच्छेच्या मोक्षरुप परिपूर्तीसाठी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • भवचक्रफेर्‍यात पुन: पुन: अडकण्यापेक्षा सध्या आपल्या जीवनात पुन: पुन: काय करायला पाहिजे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी पूर्वकालीन सर्व धर्मग्रंथांचे परमतात्पर्यस्वरुप असलेल्या ‘परमाब्धि’ ग्रंथाचे सम्यक्‌ आकलन करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी मुमुक्षूंच्या अंत:करणाची वृत्ती परमाब्धिवावचिका व्हावी म्हणजेच परमाब्धिग्रंथाचे पुन: पुन: वाचन करणारी व्हावी; परमाब्धिशोश्रूयिका व्हावी म्हणजे परमाब्धिचे पुन: पुन: श्रवण करणारी व्हावी. तसेच ती वृत्ती परमाब्धिमाम्नायिका व्हावी म्हणजेच पुन: पुन: परमाब्धिमनन - चिंतन करणारी व्हावी. या सगळ्या बाबींचे तात्पर्य हेच की मुमुक्षूंच्या अंत:करणाची वृत्ती परमाब्धिपरिक्रीडिका व्हावी म्हणजेच परमाब्धिमध्ये पुन: पुन: परिक्रीडन करणारी व्हावी.
  • ‘परमाब्धि’ हा सद्‍वर्तनाचे प्रवर्तन व दुर्वर्तनाचे निवर्तन करण्यासाठी आहे. धर्मक्षेत्रात कालौघात झालेल्या अपपरिवर्तनांचे निवारण करण्यासाठी आहे. सांप्रतकालीन आत्यन्तिक धर्मर्‍हासाच्या स्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे. स्वीय विशुद्ध धर्मसिद्‍धान्तांचे जनांना अनुवर्तन (अनुसरण) करण्यासाठी प्रेरित करणारा आहे. म्हणूनच सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • विश्वधर्मग्रंथ ‘परमाब्धि:’ मध्ये धर्मनिष्पादकत्व, धर्मप्रतिष्ठापकत्त्व, धर्मभास्करत्त्व आहे; धर्मात्मस्वरुपत्त्व, धर्मष्टतनुत्त्व आहे; धर्मधारकत्त्व, धर्मचालकत्त्व, धर्मव्यापकत्त्व आहे, तसेच धर्मगुणाकरत्त्व, धर्मबोधाकरत्त्व व धर्मसुखाकरत्त्व आहे. याचे तात्पर्य असे की - धर्मसंबंधित सर्व दिव्य वैशिष्टयांचा परमसमुच्चय परमाब्धिमध्ये पूर्णत: विद्यमान आहे. हे पूर्णत: समजून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • प्रत्येकाचा निजकर्तव्यपालनरुप धर्म म्हणजे व्यष्टिधर्म होय. सामूहिकरुपाने पाळावयाचे जे कुलधर्म, ग्रामधर्म, राष्ट्रधर्म इ. धर्म ते समष्टिधर्म होत. सर्व व्याष्टिधर्मांचे परमसमष्टिरुप म्हणजे परमाब्धिप्रतिपादित विश्वधर्म होय. विशिष्ट गुण, स्थल, काल, कार्य, अवस्था इत्यादींच्या आधारांवर असंख्य धर्मांचे दर्शन घडू शकत असले तरी सर्वांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की - ’हे सगळे असंख्य धर्म एका विश्वधर्माचेच असंख्य अवयवरुप आहेत. तत्त्वत: विश्व एकच आहे म्हणून विश्वधर्म एकच आहे. अशारीतीने विश्वधर्माचे एकत्त्व समजून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • जगातील विविध संस्कृतींमधील समान सूत्रांवर प्रमुख भर देऊन विचार केल्यास सर्वांना हे सहजपणे कळून येईल की -’ हिंदू, ताओ, कन्फ्यूशियन, शिन्तो, पार्शी, यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम इ. विविध विशिष्टसंस्कृतिमूलक विशिष्टाचारप्रधान धर्मांचे सर्वजनतारक परमदिव्यैक्यस्वरुप म्हणजे परमाब्धिसंस्थित विश्वधर्म होय. त्याचप्रमाणे जगातील सर्व संप्रदायरुप सरिद्‍धर्मांचे परममिलनस्वरुप म्हणजे परमाब्धिधर्म होय, परमसमुद्र धर्म होय. विश्वधर्म हा सर्वसमावेशक असा परसमुद्ररुपधर्म आहे, हे सखोल कळण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • परमाब्धिमध्ये धर्म हा शब्द स्वतंत्रपणे मुख्यत्त्वे सर्व मानवांकरिता असलेला विश्वधर्माकरिता प्रयुक्‍त केलेला आहे. कारण या विश्वधर्माच्या अंतरंगात उपर्युक्‍त सगळे धर्म अभिन्नत्त्वाने, एकरुपत्त्वाने संस्थित आहेत. तत्त्व: विश्वधर्म हा एकच असल्यामुळे भासमान धर्मबाहुल्य हे या एकाच विश्वधर्मावर अवभासित आहे. त्यामुळे या परमाब्धिप्रतिपादित विश्वधर्माचे सार्वत्रिक व सार्वकालिक एकत्व समजून घेण्याच्या कामी सर्वजण यशस्वी व्हावेत, अशी अपेक्षा बाळगण्यात कुठलीही हरकत नाही. या अपेक्षेच्या परिपूर्तीकरिता सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • परमाब्धिसंस्थित अनादिसिद्‍ध विश्वधर्माची सर्वांनी पुन:प्राप्ती करुन घ्यावी. त्याची परमव्याप्ती समजून घ्यावी आणि तदनुसरणाद्वारे अंतरात परमतृप्तीचा अनुभव घ्यावा. हे सगळे परमाब्धिला सुयोग्यपणे जाणून घेतल्याने घडणार आहे. कारण ‘परमाब्धि:’ हा सर्वांसाठी असलेला सार्वकालिक जीवन समुद्र आहे, सार्वत्रिकजीवन समुद्र आहे. ‘परमाब्धि:’ हा परमबोधक समुद्र आहे, परमतारक समुद्र आहे. म्हणूनच परमकल्याणासाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.